नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकच्या ओझर विमानतळाला जटायू असे नाव देण्याची मागणी करणाऱ्या महंत अनिकेत शास्त्री यांनी पुन्हा एकदा नवीन मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व धर्मियांना पूजा प्रार्थना करण्यासाठी जागा द्या, अशी मागणी अनिकेत शास्त्री यांनी केली आहे.
अधिक माहितीनुसार, नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांनी दोनच दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रामधून लवकरात लवकर रद्द करावा अशी मागणी केली होती. त्याचबरोबर फक्त आणि फक्त हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर रद्द व्हावा अशी मागणी करत मौलाना, पादरी, भंते यांच्याकडून चमत्कार सिद्ध करावयाचे दावे केले जातात. ते त्यांनी सिद्ध करून दाखवले तर आम्ही ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतो, असे चॅलेंज देखील अनिकेत शास्त्री यांनी दिले होता. आता अनिकेत शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व धर्मियांना पूजा प्रार्थना करण्यासाठी जागा द्या, अशी मागणी केली आहे. अन्यथा मुस्लिम समाजाला दिलेली नमाजाची जागा बंद करा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अनिकेत शास्त्री यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले असून देश संविधानने चालतो. त्यामुळे सर्वाना समान अधिकार द्या. प्रत्येक धर्माला विमानतळावर पूजा विधी करण्यासाठी जागा द्या, सर्वच समाज त्या ठिकाणी जाऊन पूजा विधी करेल, फक्त एका समाजाला मुभा देणे चुकीच आहे. सध्या या ठिकाणी मुस्लिम समाज नमाज पठण करत असतो, त्यामुळे मुस्लिम समाजाला दिलेली नमाजाची जागा बंद करा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. इतर धर्मातील नागरिकांसाठी प्रार्थना करण्यासाठी जर जागा उपलब्ध करून देणार नसाल तर मुंबई विमानतळावर असलेल्या नमाज स्थळ देखील बंद करण्याची मागणी अनिकेत शास्त्री यांनी केली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक विमानतळाला “हे” नाव द्यावे…
दरम्यान महंत अनिकेत शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या ओझर विमानतळाला जटायू असे नाव देण्याची मागणी केली होती. यामुळे नाशिक विमानतळ नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. कारण महंत अनिकेत शास्त्री यांच्या मागणी आधी नाशिकच्या विमानतळाला महापुरुषांचे नाव देण्याची मागणी झाली होती. त्यानंतर नाशिक विमानतळाला “जटायू” हे नाव देण्यात यावे, अशी मागणी झाली होती. परंतु कालांतराने ही मागणी देखील मागे पडली. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व धर्मियांना पूजा प्रार्थना करण्यासाठी जागा द्या, अशी मागणी अनिकेत शास्त्री यांनी केली आहे.