Home कोरोना राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ माहिती

राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ माहिती

0

जालना | भ्रमर वृत्तसेवा : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (Corona Third Wave) संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. मात्र, सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यात सध्या दररोज 13 ते 14 लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे त्यामुळे नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असेही टोपे म्हणाले. तसेच राज्यात दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचे देखील टोपे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान 25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाकडून गट क आणि ड या पदासाठीच्या 6 हजार 200 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षा केंद्रावर जॅमर बसवले जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. तसेच  जॅमर बसवल्यामूळे परीक्षेदरम्यान कॉपी सारख्या प्रकाराला आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडेल असेही ते म्हणाले.