नाशिक (प्रतिनिधी) :- रोहतक येथे झालेल्या रणजी करंडकाच्या साखळी सामन्यात नाशिकच्या सत्यजित बच्छावच्या फिरकी गोलंदाजीने कमाल केली व महाराष्ट्राच्या संघाला एक डाव आणि सात धावांनी विजय मिळवून दिला.
पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 7 असे एकूण असा 11 बळींची नोंद सत्यजितने केली. फलंदाजीतही उत्कृष्ट नमुना सादर करत त्याने अर्धशतकी खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यामुळे महाराष्ट्राला आसाम संघाला फॉलोऑन देता आला.
दुसऱ्या डावातही आसामला सत्यजितचा फिरकीचा मारा खेळता आला नाही व संपूर्ण संघ 160 धावात गारद झाला. दुसऱ्या डावात सत्यजितने 45 धावांमध्ये 7 गडी बाद केले. एकूण सामन्यात 11 गडी बाद करण्याची कमाल त्याने केली. त्याच्या या कामगिरीबद्दल नाशिक क्रिकेट असोसिएशन व नाशिककरांनी त्याला शुभेच्छा दिल्या.