पालघर । भ्रमर वृत्तसेवा : राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील रंजनपाडा परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून एका ३५ वर्षीय युवकाने वडिलांनी ९०० रुपये न दिल्याने हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ७० वर्षीय मृत जानू माळी यांना प्रत्येक महिन्याला सरकारी योजनेतंर्गत काही रक्कम मिळते. त्यांनी ९०० रुपये काही कामानिमित्त बँकेच्या अकाऊंटमधून काढले होते. मात्र जानू माळी यांचा मुलगा रवींद्र माळी हा पैसे मागत होता. परंतु जानू यांनी पैसे देण्यापासून नकार दिल्याने आरोपीला पित्याने दिलेला नकार सहन झाला नाही. त्यामुळे त्याने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत जानू यांना गंभीर दुखापत झाली. मुलाने केलेल्या या बेदम मारहाणीनंतर जानू माळी यांना मोखाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच जानू माळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु रवींद्र यांनी वडिलांना नाशिकला घेऊन जाण्याऐवजी पुन्हा घरी घेऊन आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जानू माळी यांचा मृत्यू झाला.

दरम्यान घरच्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तक्रारीनुसार आरोपी रवींद्रला अटक करुन त्याच्यावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.