अजित पवार – आदित्य ठाकरेंचे ट्युनिंग; एकाच गाडीतून प्रवास अन् पाहणी दौरा

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या वरळी भागात विकासकामांची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी स्वत: कार चालवली. तर त्यांच्या शेजारील सीटवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसले होते.

अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यातले ट्युनिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाले. आदित्य ठाकरेंनी स्वत: कार चालवत अजित पवारांना त्यांचा मतदारसंघ दाखवला. महालक्ष्मी रेड क्रॉस, वरळी, धोबी तलाव परिसराची दोन्ही नेत्यांनी पाहणी केली. आदित्य यांच्या मतदारसंघातील विविध कामांची अजित पवारांनी पाहणी केली. तसेच विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.

आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत आता कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते मोठ-मोठे करण्यात येत आहेत. आपल्या मतदारसंघाचा आणखी विकास करण्यात यावा, तसेच आपल्या मतदारसंघाचा विकास अर्थमंत्र्यांनी करावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी अजित पवार यांच्यासोबत हा दौरा केला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान त्यासोबतच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या काही दिवसांत पार पडणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईसाठी काही विशेष पॅकेज मिळते का? हे सुद्धा पहावे लागणार आहे. कारण, येत्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आज आदित्य ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!