सिंधुदुर्ग । भ्रमर वृत्तसेवा : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. त्यानुसार आज कोर्टाने निर्णय दिला असून जामीन नाकारला आहे.

तसेच संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत खालच्या न्यायालयात हजर व्हा, असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली होती. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी अॅड प्रदीप घरत तर आमदार राणे यांच्यासाठी अॅड सतीश मानशिंदे यांनी सोमवारी युक्तिवाद केला. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.
दरम्यान याबाबत नितेश राणेंच्या वकिलांनी सांगितले की, नितेश राणेंचा जामीन नाकारला आहे. इथे जामीन मिळणार नाही याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही लगेचच हायकोर्टामध्ये अर्ज केला असून उद्या किंवा परवा सुनावणी होईल असे म्हटले आहे. तसेच आमदार नितेश राणे कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आहे. गाडी अडवल्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तर पोलीस आणि निलेश राणे यांच्यात चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.