मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला; म्हणाले, विरोधी पक्षात असताना आम्ही…

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनातील विरोधकांच्या उपस्थितीवरुन टोला लगावला.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मला आज या नुतनीकरण केलेल्या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या वास्तूचे अनावरण करण्याच्या निमित्ताने येथे येण्याचे भाग्य लाभले. मुख्यमंत्री म्हणून मला स्वत:ला वैयक्तिक आनंद होत आहे. दरबार हॉल, राजभवन हे तसे काही आम्हाला नवीन नाहीये. आम्हीही जेव्हा विरोधी पक्षात होतो त्यावेळी वर्षातून एखाद-दुसऱ्यावेळी शिष्टमंडळ घेऊन येथे येत होतो. राज्यपाल महोयदयांना भेटायचो, आमच्या व्यथा त्यांच्या कानावर घालत होतो असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे.

 

तसेच ते पुढे म्हणाले, या वास्तूने अनेक घटना पाहिलेल्या आहेत. याच वास्तूतून ३० एप्रिल १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण केले होते त्याचा मला विशेष अभिमान वाटतो. या वास्तूच्या नुतनीकरणात ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. कदाचित आपले राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन असेल. इथे राजकीय हवा कशीही असू द्या पण हवा थंडच असते. इथे साप आणि मोरही आढळून येतात. अशी वास्तू शोधूनही सापडणार नाही. तसेच आपण आधुनिकीकरणाच्या नावाखाली जुने तोडून मॉर्डन अशी वास्तू उभी करतो. पण त्याचवेळी आपली संस्कृतीसुद्धा जपणे आव्हानात्मक असते. या नव्या वास्तूमध्ये आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान पारतंत्र्य ते स्वातंत्र्य असा या हॉलचा प्रवास, सशक्त लोकशाहीतील अनेक घडामोडींचा तब्बल 110 वर्षांपासून साक्षीदार आहे. तसेच या नुतन दरबार हॉलचे 8 डिसेंबर 2021 ला लोकार्पण होणार होते. पंरतु तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा त्यावेळी स्थगित करण्यात आला होता. तर  राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता २२५ इतकी होती. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!