राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरली आहे. मात्र काही शहरात जरी संख्या कमी होताना दिसली तरी काही भागात अजूनही रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाबाबत राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. कीरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी माहिती देताना त्यांनी बाधितांची आकडेवारी आणि टक्केवारी देखील सांगितली आहे.

यावेळी बोलतांना राजेश टोपे म्हणाले की, तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू येऊन गेला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी अचानक बाधितांची संख्या वाढत होती. ती आता तशी नाही. पण राज्याच्या इतर भागात त्याची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही वाढत आहे. पण सर्वजण ५ ते ७ दिवसांच्या उपचारांवर बरे होत आहेत. त्यामुळे इतर भागात वाढणारी बाधितांची सख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही असे टोपेंनी यावेळी सांगितले आहे.

तसेच राज्यात कोरोनासाठी तयार करण्यात आलेले ९२ ते ९५ टक्के बेड अद्याप रिक्त असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, फक्त ५ ते ७ टक्केच बेडवर रुग्ण आहेत. आयसीयू, ऑक्सिजनवरचे रुग्ण फारतर एक टक्के आहेत. बहुतेक कोरोनाबाधित होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे टास्क फोर्सने मार्गदर्शन करावे, जे निर्बंध आपण लावले आहेत ते किती दिवस ठेवायचे याविषयी मार्गदर्शन मिळाले, तर त्याविषयी लोकांना दिलासा मिळू शकेल असे राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान सध्या ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंट विषयी बोलतांना टोपे म्हणाले की, एका नवीन व्हेरिएंटची चर्चा सुरू झाली आहे. तो फार घातक आहे असे मी ऐकले आहे. जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे. विशेष म्हणजे त्यात मृत्यूदर ३० टक्के आहे असे सांगितले गेले आहे. तो सध्याच्या ओमायक्रॉनइतकाच वेगाने प्रसार होणारा आहे. वटवाघुळापासूनच याची सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. पण अद्याप यावर जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत आहे. त्याचे कोणतेही कोरोनाबाधित रुग्ण नव्याने कुठे आढळलेले नाहीत. त्यामुळे अद्याप त्यावर काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!