मुंबई | भ्रमर वृत्तसेवा : परीक्षा ऑनलाईन (Online Exam) घ्याव्या या मागणीसाठी काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात हिंदुस्तानी भाऊचे (Hindustani Bhau) नाव पुढे आले होते. तसेच हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास भडकावल्याचा आरोप करण्यात आला होता. हिंदुस्थानी भाऊचे (Hindustani Bhau) खरे नाव विकास फाटक आहे. या घटनेप्रकरणी आता हिंदुस्थानी भाऊला चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.
कालच्या या आंदोलनानंतर पोलीस प्रशासन खडबडून कामाला लागले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवित हिंदुस्तानी भाऊपर्यंत पोहोचले होते. त्यानतंर हिंदुस्थानी भाऊला म्हणजे विकास फाटकला आज सकाळी धारावी पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्याला वांद्रे कोर्टात हजर केले असता कोर्टाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान ४ फेब्रुवारीपर्यंत तपासात काय सापडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच या आंदोलनाप्रकरणी हिंदुस्थानी भाऊने बिनशर्त माफी मागितली असून गेल्या दीड वर्षांपासून मी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत होतो त्यावर काही उत्तर न मिळाल्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असे हिंदुस्थानी भाऊने म्हटले आहे. तसेच पोलिसांनी सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.