शरद पवारांना चौकशी आयोगाची नोटीस; ‘या’ तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत. यासंदर्भात त्यांना समन्स बजावण्यात आले असून त्यानुसार 23 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांना साक्ष देण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचे विधान केले होते. त्यानंतर या प्रकरणात अॅड प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांना साक्ष नोंदवण्यासाठी बोलावले आहे.

तसेच या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी नऊ कार्यकर्त्यांना अटक केली होती. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी केली होती. हिंसाचार झाला तेव्हा राज्यात भाजपाप्रणीत सरकार सत्तेत होते आणि तेव्हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी केला होता.

दरम्यान चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधीक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!