आमदार नितेश राणेंना पुन्हा दणका; मुंबई उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Shivsainik Santosh Parab) यांच्यावरील हल्ला प्रकरणी आता भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) चांगलेच अडचणीत येताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने (Sindhudurg court) आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज काल फेटाळून लावला होता.

तसेच त्यानंतर नितेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयानेही नितेश राणेंना दणका दिला असून त्यांना सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा नितेश राणे यांच्यासाठी एक मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी 111 पानांचा जामीन अर्ज दाखल केला होता.

काय आहे प्रकरण?

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणे गरजेचे आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!