मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे सरकारमधील मंत्री मुख्यत: शिवसेनेच्या नेत्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यावर त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. आता त्यालाच उत्तर देण्यासाठी शिवसेना उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. आणि त्यात ते मोठे खुलासे करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

आज माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ”त्यांचे(विरोधकांचे) लक्ष उद्या असायलाच पाहिजे आणि त्यांनी माझी उद्याची पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायलाच हवी. त्यांनी ऐकायला हवी, केंद्रीय तपास यंत्रणांचे जे प्रमुख आहेत, त्यांनी तर माझी पत्रकार परिषद आवर्जून ऐकायला हवी. उद्या शिवसेना हा पक्ष बोलणार नसून उद्या महाराष्ट्र बोलणार आहे. उद्या मराठी माणूस बोलणार आहे. तसेच मला वाटते उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे ते. हे धंदे सुरु आहेत ना ते बंद होणार उद्यापासून. शिवसेना हाच महाराष्ट्र आहे. कुणीही येतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. महाराष्ट्र उसळेल, अन्यायाविरुद्ध लढेल, नुसता लढणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहोत हे दाखवून देऊ, असा कडकडीत इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.

तसेच बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना जी मर्दानगी शिकवली ती मर्दानगी उद्या दिसेल. कुणीही उठावे आणि महाराष्ट्राची बदनामी करावी हे चालणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसारच ही पत्रकार परिषद होईल. तसेच ही पोलखोल नाही, खोलायला त्यांच्याकडे आहे काय? ते आतून पोकळ आहेत, अशी कोपरखिळीही राऊतांनी भाजपला मारली आहे. त्यामुळे आता राजकारण आणखी तापले आहे. त्यामुळे विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वाचे लक्ष हे राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे असणार आहे. त्यामुळे उद्याच्या या बहुचर्चित पत्रकार परिषदेने महाराष्ट्रातील राजकारणाचा सस्पेन्स वाढवला असून संजय राऊत उद्या नेमका काय खुलासा करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.