विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊंचा हात? पोलिसांकडून तपास सुरु

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : शहरातील धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला तोडफोडीचं गालबोट लागले असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना जमावाला थोपण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला आहे. तर हे आंदोलन नियोजन करुन करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.

तसेच दुसरीकडे नागपूर आणि औरंगाबादमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून ऑफलाईन परीक्षा रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी नागपूरच्या तुकडोजी चौकात आंदोलन केले. यावेळी आंदोलनाला हिंसळ वळण लागून विद्यार्थ्यांनी चौकात उभी असलेली एक बस फोडली आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कुणाचं नेतृत्त्व आहे? या विद्यार्थ्यांना कोण भडकवतंय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तर या आंदोलनात हिंदुस्थानी भाऊचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला असून हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. सरकार म्हणतेय की घरात रहा, काळजी घ्या, मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, मग परीक्षा ऑफलाईन का, असा सवाल हिंदुस्थानी भाऊने विचारला आहे.

दरम्यान या आंदोलनानंतर हिंदुस्थानी भाऊने प्रतिक्रिया दिली असून तो म्हणाला आहे की, आज तिन महिने झाले असून हे विद्यार्थी वर्षा गायकवाड यांना सांगत आहेत. त्यांचा आवाज विद्यार्थ्यांनी ऐकला नाही. त्या विद्यार्थ्यांनी आज माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला, तर मी आज वाईट झालो का? कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकला. तुम्ही सर्व बैठका ऑनलाईन घेता, मग विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन का. हे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. परीक्षा नको असे मी म्हणालोच नाही. फक्त ती परीक्षा पुढे ढकला. तसेच तीन महिन्यापासून विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. मी आज सरकारला आवाहन करतोय की परीक्षा पुढे ढकला. खेडेगावात आज हजारो विद्यार्थी आहेत. त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेताच आले नाही. लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना आवाहन केले होते. आता विद्यार्थ्यांनी मला आवाहन केले की आमच्यासाठी उभे राहा म्हणून मी आज त्यांच्यासाठी उभा आहे. असे हिंदुस्थानी भाऊने म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!