मुंबई | भ्रमर वृत्तसेवा : भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने 2 विविध पोलीस ठाण्यात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात तर त्याच महिलेच्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगात ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगात प्रत्यक्ष उपस्थित राहत या महिलेने घटना सांगितली व तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना तपास करून ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान त्यानंतर १५ तारखेला नवी मुंबई पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्या विरोधात आयपीसी ५०६ ब हा गुन्हा दाखल झाला. १६ तारखेला नेरूळ पोलीस ठाण्यात आयपीसी ३७६ हा गुन्हा दाखल झाला आहे. दाखल झालेले दोन्ही गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असून, गणेश नाईक यांना अटक करून त्याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
जाणून घ्या काय म्हटले आहे तक्रारीत ?
आ. गणेश नाईक यांच्या विरोधात १९९३ पासून एका महिलेला लग्नाचे आमिष देऊन व जीवे मारण्याची धमकी देऊन शोषण केले. आमिषाला आणि त्यांनी दिलेल्या धमकीमुळे ही महिला त्यांच्यासह लिव्ह-इनमध्ये आहे. या संबंधातून त्यांना १५ वर्षांचा मुलगा आहे. पीडित महिलेने लग्नाची मागणी केल्यावर नाईक यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. वैवाहिक अधिकार व मुलाला पितृत्वाचा अधिकार मागितला असता मुलासह जीवे मारण्याची धमकी दिली. नाईक यांचा मुलगा या महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.