अनिल देशमुखांविरोधात सचिन वाझेंनी ईडीसमोर ठेवला ‘हा’ मोठा प्रस्ताव

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार बनण्याचा प्रस्ताव ठेवला असून याबाबत त्यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) पत्र पाठवले आह़े.

सचिन वाझेने ईडीला पाठवलेल्या पत्रात म्हटले की, या संदर्भातील मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. ‘सीआरपीसी’च्या कलम ३०६, ३०७ नुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो’’, असे पत्र वाझेंनी ‘ईडी’चे सहाय्यक संचालक तसीन सुल्तान यांना लिहिले आहे. या प्रकरणाबाबत आता ‘ईडी’चे अधिकारी विशेष पीएमएलए न्यायालयाच्या परवानगीने वाझेंचा जबाब महादंडाधिकाऱ्यापुढे सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत नोंदवू शकतात़.

तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूचनेवरून एप्रिल २०२० मध्ये तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना, पुन्हा सेवेत घेण्यासाठी विनंती अर्ज पाठविल्याचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तर चांदिवाल समितीला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वाझेने अनिल देशमुख यांच्या आदेशावरूनच मुंबईतील बार चालकांकडून पैसे वसूल करत होते, असे म्हटले आहे.

तसेच वांद्रे येथे प्रतिबंधित एन-९५ मास्कचा साठा जप्त केला. त्यात माझी मोठी भूमिका होती. मी निलंबित असतानाही मी काम केले आहे, असा दावा वाझे याने केला. तर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावेळी देशव्यापी पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. मी निलंबित असतानाही माझ्या कामगिरीवर ते आनंदी होते. त्यामुळे अनिल देशमुख यांनी माझे निलंबन रद्द करण्यात येईल, असे म्हणत मला तसा विनंती अर्ज तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना देण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या सूचनेचे मी पालन केले आणि ते रेकॉर्डवर आहे, असे वाझे यांनी ११ डिसेंबर रोजी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

दरम्यान दुसरीकडे ईडी (Enforcement Directorate) ने दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी ईडी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यावर 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार असून अशात वाझेने ईडीला लिहिलेल्या पत्रामुळे देशमुख यांना जामीन मिळतो का, हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!