शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश; काय आहेत नवीन नियम? जाणून घ्या सविस्तर

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे लवकरच महाराष्ट्र अनलॉक (maharashtra unlock) होणार आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांची ( chhatrapati shivaji maharaj jayanti 2022) जयंती जवळ आली आहे. त्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. मात्र, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे आणि तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत.शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योत दौडीत २०० जणांना सहभागी होता येईल. तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्यात ५०० जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

दरम्यान, गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कोणताही सण, उत्सव हा नेहमीसारखा मोकळेपणाने साजरा करता आलेला नाही. कोरोनामुळे दोन वर्षातल्या प्रत्येक सण उत्सव, जयंतीवर काही ना काही निर्बंध राहिले आहेत. मागील दोन वर्ष मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाचा दाह कमी होत असल्याने राज्य सरकारने शिवजयंती उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारने ही नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!