Home क्राईम राज्य सरकारकडून साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

राज्य सरकारकडून साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

0

मुंबई | भ्रमर वृत्तसेवा : येथील साकीनाका (Saki Naka Rape Case) परिसरात दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील निर्भयासारखा (Nirbhaya) धक्कादायक प्रकार घडला होता. एका महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार उघडकीस आला होता. गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, पीडित महिला ही विशिष्ट समाजाची असल्याने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे आणि त्याने गुन्हाच्या संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. घटनास्थळावर गुन्हा कसा घडला या घटनाक्रमातून सर्व पुरावे मिळाले आहेत. आरोपीकडून गुन्हासाठी वापरण्यात आलेले हत्यार सुद्धा जप्त करण्यात आले  आहे, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी शासकीय योजना लागू केल्या आहेत. मुख्यमंत्री निधीतून आणि शासकीय योजनांमधून पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

दरम्यान, साकीनाका येथे महिलेवर बलात्कार होऊन त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने स्वत: चर्चेसाठी बोलावून या घटनेकडे राज्य शासन गांभिर्याने पहात असून पीडितेच्या कुटूंबास योग्य तो मोबदला देण्यात येवून तिच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल असे आयोगास सांगितले आहे.