भीषण आगीत भंगाराची १७ गोदामे जळून खाक

भिवंडी । भ्रमर वृत्तसेवा : भिवंडी शहर व ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरु असून आज पहाटेच्या सुमारास पुन्हा लाखोंचे भंगार साठवून ठेवलेल्या भंगार गोदामांना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे १७ गोदामे जळून खाक झाली असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरातील फातमा नगर भागात भंगारांची गोदामे आहेत. या गोदामांना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती.सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांसह पाण्याच्या टँकरने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र तोपर्यत आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल १७ भंगार गोदामे पडल्याने जळून खाक आहे.

दरम्यान या भंगार गोदामात कापडाच्या चिंध्या,लोचन,प्लास्टिक पुठ्ठा मोठ्या प्रमाणावर साठविल्याने आग अधिकच भडकून लगतच्या इतरही गोदामांना त्याची झळ पोहचली आहे. मात्र आगीचे कारण अजून अस्पष्ट असून आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. तर अग्निशमन दलाच्या जवानांच्या चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले असून या ठिकाणी सद्या कुलिंगचे काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. तसेच या आगीची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!