वहिनीला आधार देत १९ महिन्यांच्या चिमुकलीसाठी तो बनला ‘बापमाणूस’

अहमदनगर । भ्रमर वृत्तसेवा : लग्न ही अशी गोष्ट आहे. जेथे दोन वेगवेगळे व्यक्तीच नाहीतर दोन कुटुंबही एकत्र येतात. एका महिलेसाठी लग्नानंतर तिचा नवराच सगळे काही असतो. परंतु अनेकदा काही कारणामुळे लग्नानंतर अगदी काही काळातच नवऱ्याचे निधन झाल्यामुळे बायकोवर काळाचा घाव होतो. अशा घटनेनंतर बायका एकट्या पडतात आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडते. परंतु एकट्या महिलेला कोणाच्याही आधाराशिवाय घर सांभाळणे कठीणच जाते. समाजात लोक यासगळ्याकडे बघ्याची भूमिका घेतल्याशिवाय काहीही करु शकत नाहीत. परंतु नवऱ्याच्या मृत्यूनंतर महिलेच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कोणी कधी का विचार करत नाही? बायकोच्या मृत्यूनंतर नवरा दुसरे लग्न करु शकतो मग महिला का नाही? परंतु आता ही मानसिकता कुठेतरी बदलताना दिसत असून याच एक उदाहरण समाजापुढे अहमदनगरमधील समाधान शेटेने ठेवले आहे.

अहमदनगरच्या या लग्नसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भावाचा मोठेपणा, वहिनीचा सामंजस्यपणा आणि कुटुंबीयांनी दाखवलेली समजूतदारी यामुळे हा लग्नसोहळा भावाच्या निधनाचे दु:ख काही काळ बाजूला सारत आनंदी वातावरणात पार पडला. कोरोनाने मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात २३ वर्षीय भावजय आणि तिची १९ महिन्यांची चिमुकली दुःखात लोटले गेले. या कुटंबातील समाधान याने मनाची हिम्मत दाखवत आपल्या चिमुकल्या पुतणीचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. चुलते, वडिल आणि सहविचाराने भावजयीबरोबर लग्नगाठ बांधली. रविवारी ३० जानेवारी रोजी म्हाळादेवी येथील खंडोबा मंदिर प्रांगणात हा लग्नसोहळा पार पडला.

विधवा वहिनीसोबत लग्न करुन दीराने समाजात भान जपले. तालुक्यातील ढोकरी येथील निलेश कारभारी शेटे (31) यांचे 14 ऑगस्ट 2021 रोजी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झाले. ते हिरपाडा, जव्हार येथे आश्रमशाळेत सेवेत होते. आश्रमशाळेतील मुले, शिक्षक कोरोनाबाधित झाले. त्यात निलेश यांनाही कोरोनाची बाधा झाली. कोरोनातून सावरत असतानाच त्यांच्या मेंदूत गाठ झाली आणि नाशिक येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांची 23 वर्षांची पत्नी पूनम आणि 19 महिन्यांची चिमुकली आणि सर्व कुटुंब दु:खाच्या खाईत लोटले गेले.

दरम्यान या अपघातातून सावरण्यासाठी घरातील समाधान कारभारी शेटे या 26 वर्षीय तरुणाने वहिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे चुलते सीताराम शेटे, सामाजिक कार्यकर्ते माधव तिटमै, भाऊ मंगेश शेटे, पुनमचे माहेरकडील टाहाकारी येथील एखंडे कुटुंब यांनी सकारात्मक विचार केला. विधवा मुलीची व सर्व कुटुंबाची मानसिकता तयार केली. रविवारी (दि. ३० जानेवारी) जानेवारी २०२२ ला हा विवाह योग जुळून आला. अहमदनगर येथील म्हाळादेवी खंडोबा मंदिर प्रांगणात हा लग्न सोहळा पार पडला.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!