सिंधुदुर्ग । भ्रमर वृत्तसेवा : भाजपचे आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली असून त्यांना पुढील उपचारासाठी काही वेळात कोल्हापूरला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी केली जाणार आहे. तर आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असून त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी मिळणार की जामीन हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.

मिळालेली माहितीनुसार नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर काल आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कणकवलीत आणण्यात आले होते. त्यानंतर कणकवलीहून ओरोस जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.त्यावेळी रक्तदाब वाढल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते.
दरम्यान जिल्हा रुग्णालयात कार्डियाक सिस्टीम उपलब्ध नसल्याने कोल्हापूरमध्ये नेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. यानंतरच उपचार करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्गातून थोड्याच वेळात 108 रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात नेले जाणार असून पडवे मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. आर एस कुलकर्णी आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.