सिंधुदुर्ग । भ्रमर वृत्तसेवा : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाला असून आज कोर्ट निर्णय देणार आहे. दुपारी ३ वाजता निर्णय दिला जाईल असे जिल्हा सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी दोन्ही बाजूंच्या वकीलाना सांगितले आहे. परंतु त्याअगोदर आमदार नितेश राणेंना मोठा धक्का बसला असून त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब (rakesh parab) यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राकेश परब हे साेमवारी स्वतःहून कणकवली (Kankavali) पोलिस (police) ठाण्यात हजर झाले होते.

परब यांची तब्बल आठ तास पोलीसांनी चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी राकेश परब यांना कणकवली पोलिसांनी अटक केली. आज (मंळवार) सकाळी परब यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने यावेळी राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर निकाल हाेण्याची शक्यता असल्याने काेकणातील महत्वाच्या तालुक्यांत कडेकाेट पोलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान सरकारी पक्षातर्फे १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. तर यामध्ये इतर आरोपींना अटक, मोबाइल हस्तगत करणे हे मुद्दे मांडण्यात आले होते. परंतु न्यायालयाने राकेश परब यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच जामीन अर्जावरील सुनावणीसाठी संतोष परब यांच्यासाठी अॅड प्रदीप घरत तर आमदार नितेश राणे यांच्यासाठी अॅड सतीश मानशिंदे यांनी सोमवारी युक्तिवाद केला होता.