महाराष्ट्र मास्क मुक्त होणार ? अजित पवार म्हणाले…

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. त्यामुळे मास्कमुक्त महाराष्ट्राची चर्चा सुरू झाली. गुरुवारी राज्याच्या कॅबिनेटमध्ये यासंदर्भात चर्चा देखील झाली. त्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का, तशी घोषणा राज्य सरकार करणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

याबाबत बोलतांना अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात मास्कबाबत साधी चर्चाही झाली नाही. निर्णयही झाला नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत. त्यात काही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्वच मास्क कायम ठेवण्याच्या मताचे आहोत. बाहेरच्या देशात मास्कची सक्ती उठवल्यानंतर त्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे मास्क हे राहिलेच पाहिजे असे आमचे मत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील मास्कबाबत आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका. मास्क हे कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान गुरुवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्राबद्दल चर्चा झाली. कोरोना रुग्णांची घटलेली संख्या, लसीकरणात होणारी वाढ यांचा विचार करून महाराष्ट्राला मास्कमुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली. मास्कमुक्तीचा निर्णय घेणाऱ्या देशातील परिस्थिती पाहिली जाईल, तिथल्या स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. तसेच टास्क फोर्सशी चर्चा करून याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल अशीही शक्यता वर्तवली जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!