राज्याचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा साईबाबा शिर्डी संस्थांनचे माजी उपाध्यक्ष शंकरराव गेनुजी कोल्हे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी आज पहाटे ४.३० वाजता नाशिक येथे वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हे गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांना नाशिकच्या सुश्रुत रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.शंकरराव कोल्हे हे नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांचे वडील होते.

कोल्हे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे २४ मार्च १९२९ रोजी झाला होता. येसगावचे सरपंच ते राज्याचे मंत्री या प्रवासात त्यांनी राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग, शेती या क्षेत्रात अनेक पदावर यशस्वी रित्या काम केले आहे. ते नाशिकच्या मविप्र या शैक्षणिक संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार याचे वडील होते.

शंकरराव कोल्हे १९७२ मध्ये ते प्रथम अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले. ते कोपरगाव विधानसभा मतदार संघातून सहा वेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी महसूल, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणा या खात्याचे मंत्री म्हणून यशस्वीरित्या काम पहिले. तसेच जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ असलेल्या श्री. साईंबाबा शिर्डी संस्थांनचे ते ९ वर्ष उपाध्यक्ष होते.

कोल्हे यांनी राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग, शेती या क्षेत्रात काम करीत असताना अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व संस्था आजही उर्जित अवस्थेत असून भरारी घेत आहेत. या सर्व संस्थांच्या माध्यमातून हजारो कुटुंबाना रोजगार देण्यात, हजारो विधार्थ्याना उच्चशिक्षित बनविण्यात, शेतकऱ्यांना आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

माजी मंत्री कोल्हे हे अत्यंत शिस्तप्रिय होते. त्याच्या अभ्यासू व आक्रमक स्वभावामुळे त्यांचा राज्याच्या राजकारणात दबदबा होता. ते कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्षही होते. तर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष होते. स्व. कोल्हे यांच्या ७२ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीच्या झंजावाताचा अस्त झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून त्यांच्यावर आज सायंकाळी ४.३० वाजता कोपरगाव येथील संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!