Home महाराष्ट्र अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; आता ‘या’ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; आता ‘या’ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

0

नागपूर | भ्रमर वृत्तसेवा :    राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसत आहे. अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर आज आयकर विभागाने छापेमारी (Income Tax raid) केली आहे. नागपुरातील सिव्हिल लाइन परिसरातील घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. 

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आयकर विभागाची टीम दाखल झाली आहे. नागपुरातील जीपीओ चौक येथील निवासस्थानावर आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्या काटोल निवास स्थानावर देखील आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यासोबतच नागपूरच्या हॉटेल ट्राव्होटेल येथे देखील आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.

अँटिलिया स्फोटके प्रकरणानंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही या प्रकरणात जावे लागले. त्यामुळे संतापलेल्या सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. सचिन वाझे व अन्य काही पोलीस अधिकाऱ्यांना देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंह यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, राजीनामा दिल्यानंतरही ईडी, आयकर विभाग व सीबीआय चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.

दरम्यान मनी लॉण्ड्रिंगचा आरोपही अनिल देशमुख यांच्यावर आहे. यापूर्वी ईडी व सीबीआयने अनेकदा देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी छापे टाकले होते. देशमुख यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आले होते. मात्र, अद्याप ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. असे असले तरी देशमुख यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे  तपास यंत्रणांचे काम सुरूच आहे. याचाच भाग म्हणून आज नागपूर येथील घरी छापे मारण्यात आले आहेत.