राज्यातील मास्क सक्ती हटवण्याबाबत मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण (vaccination) सुद्धा मोठ्या वेगाने सुरू आहे. त्याच दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Meeting) नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्य मास्कमुक्त (Mask Free Maharashtra) करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. त्यामुळे राज्य लवकरच मास्कमुक्त होणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. यासंदर्भात नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मास्कविषयी महत्त्वाचे विधान केले आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, आपण हा गैरसमज काढून टाकला पाहिजे की मास्कची सक्ती हटवण्यात येईल. आत्तापर्यंत आपण जे काही निर्णय घेतलेत ते सगळे डॉक्टर्स, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने अजूनही ही कोरोनाची साथ संपली आहे असे कुठेही जाहीर केलेले नाही. ओमायक्रॉनचा कोणताही व्हेरिएंट हा सौम्य किंवा गंभीर आहे असेही सांगितलेले नाही. कारण व्हेरिएंट हा व्हेरिएंट असतो. मी एकच सांगू शकेन की जर आपल्याला स्वत:ला वाचवायचे असेल, तर आत्तापर्यंतचे सर्वाच चांगले शस्त्र हे मास्क आहे”, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले आहे.

दरम्यान, कोरोनाविषयीच्या निर्बंधांबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील मास्कविषयी सूतोवाच केले होते. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड, युरोपीय राष्ट्रांमध्ये, अमेरिकेतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र त्या ठिकाणी विशेषतः युकेमध्ये मास्कमुक्ती करण्यात आलेली आहे, निर्बंध कमी केले आहेत. पण भारताचा विचार केला तर कोरोनासोबत जगण्यासाठी आता नवी नियमावली बनवायला हवी’ अशी अपेक्षा राजेश टोपेंनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मास्कविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!