अहमदनगर । भ्रमर वृत्तसेवा : मनुष्यबळ अपुरे असल्याने सरकारने पहिल्या टप्प्यात ५ हजार पोलिसांची भरती केली असून दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २०० पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 5,200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती लवकरात पूर्ण केली जाईल. ही भरती पूर्ण होताच पुढच्या 7,200 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. दिलीप वळसे पाटील यांच्या माहितीमुळे राज्यभरातील अनेक तरुणांच्या आशा बळावल्या असून, सरकारी नोकरीचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
तसेच दिलीप वळसे पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, 5,200 पदांसाठी सुरु असलेल्या पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी झाली आहे. आता केवळ अंतिम यादी जाहीर करण्याचे काम सुरु आहे. ही भरती पूर्ण होताच पुढच्या भरतीसाठीही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या भरतीची प्रक्रिया पूर्ण होताच दुसऱ्या भरतीसाठी सुरुवात होणार असल्याचे वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान राज्यातील तरुणांना सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यातच राज्यातील तरुणांच्या हाताला काम दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बेकारी कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर देशभरातील तरुणांमध्ये सध्या बेरोजगारी आणि महागाई या विषयांवरुन मोठा असंतोष आहे. त्यामुळे राज्य सरकार वेळीच सावध झाले असून भरती प्रक्रिया सुरु करण्याचे संकेत दिले आहे.