वर्धा । भ्रमर वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळून मारणारा नराधम विकेश उर्फ विक्की नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अंतिम सुनावणीवेळी सरकारी पक्षाची बाजू मांडताना आज अॅड. उज्जवल निकम यांनी अनेक दाखले दिले. थरकाप उडविणाऱ्या या जळीतप्रकरणात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर येथील रुग्णालयात अंत झाला होता. त्यामुळे, महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले होते.

आज 10 फेब्रुवारी हिंगणघाट पीडितेच्या निधनाला दोन वर्षे झाली आहेत. आरोपी विकेश नगराळे याला मृत्यूदंड द्यावा अशी शिक्षेची मागणी आम्ही केली आहे. आरोपीचाही युक्तिवाद यावेळी झाला. आरोपीतर्फे सांगण्यात आले की, त्याचे लग्न झाले आहे त्याला दया दाखवावी. या उलट आरोपीला कठोर शासन खुनाच्या आरोपात जे दिले जाऊ शकते, त्यात आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी आम्ही न्यायालयात केली आहे. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असे सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी म्हटले आहे.
दरम्यान बुधवारी हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. परंतु दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज संध्याकाळी पाचच्या सुमारास या निकालाचे वाचन करण्यात आल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आज मृतक अंकिता हिच्या पुण्यतिथीच्या दिवशी कोर्टाने निकाल दिल्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
काय घडले होते त्या दिवशी?
हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. गंभीर जखमी पीडितेचा नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवार, १० फेब्रुवारीला मृत्यू झाला. हिंगणघाटच्या वर्दळीच्या चौकातच घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. घटनेचे राज्यात विविध ठिकाणी पडसाद उमटले.