Home महाराष्ट्र नदीत बोट उलटल्याने तिघांचा मृत्यू, आठ जण बेपत्ता

नदीत बोट उलटल्याने तिघांचा मृत्यू, आठ जण बेपत्ता

0

वर्धा | भ्रमर वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील बेनोडा पोलीस स्टेशन (Benoda Police Station) अंतर्गत येणाऱ्या वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे बोट बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये ११ जण बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. तर इतरांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत. नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यावर जात असताना बोटीला अपघात झाला आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान या बोटीतून जवळपास 20 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. बोट नदीच्या मधोमध आली असताना अचानक बोट बुडाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत काही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तर आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप आठ जणांचा शोध सुरू आहे.घटनास्थळी पोलीस प्रशासनासह स्थानिक लोक उपस्थित आहेत. आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहामध्ये एका तीन वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. तसेच एक पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. तर उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे.