गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना भीषण आग; प्रवाशांची धावपळ

नंदुरबार । भ्रमर वृत्तसेवा : गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग (Gandhidham Puri Express catches fire) लागली आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकापासून (Nandurbar Railway Station) काही अंतरावर ही घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, ही आग आणखी वाढत असल्याचे दिसत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, गांधीधाम येथून पुरीच्या दिशेने ही ट्रेन निघाली होती. नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर गाडी असताना एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशी तात्काळ गाडीतून खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तसेच ही आग सुरुवातीला ट्रेनमधील पॅन्ट्रीच्या डब्याला लागली. त्या पॅन्ट्रीच्या डब्यात खानपानाचे साहित्य, सिलिंडर असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. सध्यातरी रेल्वेत कुणीही प्रवासी नसून सर्व प्रवाशांचे साहित्य मात्र ट्रेनमध्ये आहे.

दरम्यान घटनास्थळी नंदुरबार अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. तर ज्या डब्यांना आग लागली होती ते दोन डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले आहेत. या डब्यांना लागलेली आग विझवण्यात येत असून दोन डब्यांत कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!