सिंधुदुर्ग | भ्रमर वृत्तसेवा : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राणे कुटुंब आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे.

सरकारी वकीलांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास अहवाल कोर्टात सादर केला होता. तसेच नितेश राणे यांचा थेट सहभाग गुन्ह्यात आहे, असे म्हणणे पोलिसांनी मांडले आहे. ज्या पीएच्या फोनवरुन फोन केले होते, त्या पीएलादेखील अटक केली असून दोघांना समोरा-समोर बसवून चौकशी करायची आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान या अगोदर नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला होता. तसेच, ते न्यायालयासमोर शरण देखील आले होते. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली होती.तर नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी म्हटले होते की, “नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचे सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरे जाण्याची इच्छा आहे असे सांगितले होते.