मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुण्यात हल्ला करण्यात आला होता. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहिले असून त्यात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर चंद्रकात पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडीला गंभीर इशारा दिला आहे.

मॉब लिंचिंग करुन किरीट सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी यावेळी राज्य सरकारवर केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, अनिल देशमुख चकवा देत राहिले. नंतर त्यांना अटक झाली. संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. खुद्द ठाकरे कुटुंबीयांवर देखील आरोप झाले, पण यात कधीही अशी स्थिती आली नव्हती की किरीट सोमय्यांवर हल्ला व्हावा. केंद्राची झेड सुरक्षा असताना धक्के मारून किरीट सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न हा गेल्या २७ महिन्यांत पहिल्यांदा झाला असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, आता फार झाले. किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांना मी पत्र लिहिले आहे की याची गंभीर दखल घ्यावी लागेल. पुणे पोलिसांनी तकलादू कलमे लावली. पुणे पालिकेची सुरक्षा काय झोपा काढत होती का? सुटी असताना पालिकेच्या आत १०० लोक कशी आली? पुणे पालिकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की झाली असून त्यांनी पुणे आयुक्तांना दोन दिवसांची नोटीस दिली आहे”, असे पाटील यावेळी म्हणाले.