आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी

सिंधुदुर्ग | भ्रमर वृत्तसेवा : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Shivsainik Santosh Parab) यांच्यावरील हल्ला प्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurg sessions court) फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) जामीनासाठी 111 पानांचा जामीन अर्ज दाखल करत पुन्हा एकदा धाव घेतली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिल्याने नितेश राणे यांनी जामीन अर्ज मागे घेत सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर होत असल्याची माहिती माध्यमांना दिली होती.
त्यानंतर ते शरण गेले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तसेच नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग येथील कोर्टात शरण अर्ज दाखल केला. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तर सरकारी वकिलांकडून नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी पोलिसांना सबळ कारण देणे अपेक्षित होते. तर दुसरीकडे नितेश राणे स्वत:हून कोर्टात शरण गेल्याने अखेर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग येथील सत्र न्यायालयात सुनावणी सुरु असताना कोर्टाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. तर जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून दगंल नियंत्रण पथक दाखल झाले आहे. तर नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांचे वकील सतीश मानेशिंदे हे सिंधुदुर्ग कोर्टात जामीनासाठी अर्ज करतील. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला. त्यांना कदाचित आजही जामीन मिळू शकतो. पण याप्रकरणी अद्यापही न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सरकारी वकिल प्रदीप घरत कोर्टात दाखल झाले असून त्यांच्याकडून पोलीस कोठडीची मागणी सुरु आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!