संजय राऊतांचा राज्यपालांवर हल्लाबोल; म्हणाले, त्यांना पदावर…

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात बदल करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुकीसाठी तारीख निश्चित करता येत नाही, अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. तसे पत्र राज्यपालांनी विधिमंडळ सचिवालयाला पाठवले असून ही निवडणूक पुन्हा लांबणीवर गेली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्याची महाविकास आघाडी सरकारची योजना होती. त्यानुसार राज्यपालांकडे परवानगी मागण्यात आली होती. पण ती राज्यपालांनी नाकारली आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेते वारंवार राज्यपालांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची विनंती राज्यपालांना करत आहे. राज्यपाल ते पद भरत नाहीत याचा अर्थ राज्यपाल राजकारण करत आहेत. याचा अर्थ राज्यपाल ज्या पक्षातून आले आहेत, त्या पक्षाच्या दबावामुळे ते राजकारण करत आहे. राज्यपाल विरुद्ध सरकार अशा प्रकारचा संघर्ष अनेक राज्यात झालेला आहे आणि सुरू आहे. पण महाराष्ट्रात (maharashtra) ज्या पातळीवर राज्यपालांनी आणि त्या पक्षाने हा संघर्ष नेऊन ठेवला त्याची इतिहासात काळ्या अक्षरात नोंद होईल. राज्यपालांनी ज्या वारंवार भूमिका घेतल्या, त्या कायद्याच्या आणि घटनेचा भंग करणाऱ्या आहेत. अशा घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणे, पदावर राहू देणे आणि त्यांच्या माध्यमातून बहुमतातील सरकारला अडचणी करू देणे हे सातत्याने आयोग्य आहे, असे संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटले आहे.

तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेसच्या जी-23 नेत्यांवरही टीका केली. जी-23 आणि काँग्रेसमध्ये काही फरक नाही असे मला वाटते. जी-23 कुणाची तरी सुपारी घेऊन काँग्रेसच्या विरोधात काम करत आहे असे मला वाटते. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षाचे स्थान राहिले पाहिजे. विरोधी पक्ष मजबूत राहिला पाहिजे. जेव्हा विरोधी पक्ष एकत्र येण्याची गोष्ट करतो तेव्हा त्यात काँग्रेस असला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे असे राऊत म्हणाले.

दरम्यान अध्यक्षपदासाठी गुप्तऐवजी खुल्या पद्धतीने मतदान घेण्याकरिता विधानसभा नियमात गेल्या डिसेंबरमध्ये बदल करण्यात आले होते. या बदलांना भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने याचिका फेटाळली होती. याविरोधात महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाजन यांच्या याचिकेवर तातडीची बाब म्हणून सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी केली. त्यावर नियमित सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!