पुणे । भ्रमर वृत्तसेवा : पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात मॉलचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाला असून 5 कामगार जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून हे सर्व कामगार परराज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी गजांची जाळी विणत असताना काल रात्री 10.45 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून या जाळीखाली मजुर अडकल्यामुळे त्यांना तातडीने बाहेर निघता आले नाही. अग्निशमन दलाचे जवान आणि येरवडा पोलिसांच्या मदतीने मदतकार्य पार पाडण्यात आले. दरम्यान यासंदर्भात दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली आहे.
तसेच या घटनेबाबत राहुल श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार,वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम आज रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते. त्या दरम्यान बेसमेंटची जाळी कोसळून त्यामध्ये 10 जण गंभीर जखमी झाले. त्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य पाच जणांवर उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या साहाय्याने मदत कार्य पार पडले असल्याचे त्यांनी सांगितले.तर पुण्यातील या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सोबतच जे जखमी झालेले आहे त्याची प्रकृती लवकर सुधारावी असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान या घटनेनंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये अग्निशमन दलाचे जवान लोखंडी सळईखाली दबल्या गेलेल्या मजुरांना बाहेर काढताना दिसत आहेत. त्यासाठी अग्निशमन दलाचे जवान त्यांच्याकडे असलेल्या कटरच्या माध्यमातून लोखंडी सळई कापताना दिसत आहेत. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. तर पोलिसांनी तत्काळ सूत्र हालवत बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार, पर्यवेक्षक, सुरक्षा अभियंता आणि बांधकाम साइटशी संबंधित काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 304, 336, 337 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे.