पुणे । भ्रमर वृत्तसेवा : महानगरपालिकेच्या (Pune Corporation) परिसरात शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या अक्षरशः पायरीवर पडलेले पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले.

मिळालेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले. तसेच पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.

दरम्यान शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे ट्वीट सोमय्या यांनी केले आहे.
I am attacked by Shivsena Gundas inside the premises of Pune Mahapalika@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2022