धक्कादायक : शिक्षक पात्रता परीक्षेत ‘इतक्या’ उमेदवारांना पैसे घेऊन केले पास

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : राज्यात परीक्षा घोटाळा (TET exam scam) समोर येत असताना आता टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षेत आपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थींना पात्र ठरवण्यात आल्याचे सायबर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याच्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे. २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेतही मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याची शक्यता असल्याने या परीक्षांचाही तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास करताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांना देण्यात आलेली माहिती आणि मूळ निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून केली जात आहे. २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ जणांना पात्र असल्याचा निकाल लावण्यात आलेला. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष निकाल पडताळून पाहिल्यानंतर तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र असल्याचे समोर आले. असे असतानाही या सर्वांना पात्र असल्याचे दाखवण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.

दरम्यान २०१३ पासून टीईटीच्या माध्यमातून झालेल्या भरतीमधील शिक्षकांची प्रमाणपत्रे खरी आहेत का याची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण परिषदेने नुकताच घेतला आहे. यासाठी राज्यामधील सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिकांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांना तपासासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. पुणे सायबर पोलीस सध्या २०१८ आणि २०२० मधील टीईटी घोटाळ्याचा तपास करत आहेत. तसेच या परीक्षेमध्ये २०१३ पासूनच घोटाळा होत असल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मागील आठ वर्षांचे निकाल आणि प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील १५ दिवसांमध्ये राज्यातील साडेपाच हजार शिक्षकांनी आपली प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडे पाठवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!