टीईटी परिक्षा घोटाळा प्रकरणी ‘या’ आयएएस अधिकाऱ्याला अटक

पुणे । भ्रमर वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून राज्यभरात टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात मोठ्य़ा अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी माजी आयुक्त तुकाराम सुपे, सुखदेव डेरे अशा अनेक बड्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात अटक केली आहे. आता मंत्रालयातील उपसचिव दर्जाचे अधिकारी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर (sushil khodvekar) यांना ठाणे शहरातून अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी सकाळी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना टीईटी गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी ठाण्यातून त्यांना अटक केली आहे. सुशील खोडवेकर सध्या राज्याच्या कृषी विभागात कार्यरत असून खोडवेकर हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तर 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत खोडवेकर हे शिक्षण विभागात कार्यरत होते. त्यांनी सावरीकर यांच्याकडून पैसे घेतले असल्याचे तपासात समोर आल्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यावर एकापेक्षा एक खळबळजनक प्रकरणे समोर येत आहेत. त्यातच काल टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे. पैसे घेऊन TET परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!