सातारा । भ्रमर वृत्तसेवा : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसेच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केले जात असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. याला अनेक ठिकाणी विरोध होत आहे. साताऱ्यातही गुरुवारी व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत आंदोलन झाले. हे आंदोलन बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनादरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. तसेच यावेळी बंडातात्या यांनी राजकीय नेत्यांविरोधात जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तर साताऱ्यातील या आंदोलनप्रकरणी कोरोना नियमांचे उल्लंघन करत व जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह सुमारे १२५ जणांवर साथरोग अधिनियम ३ तसेच इतर कलमाखाली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान महिला आयोगानेही बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आला होता. गुरुवारी पोलिसांनी बंडातात्यांच्या दोन्ही मठांवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि साताऱ्यातील फलटण करवडी येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना साताऱ्याकडे नेले जाणार आहे.