राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये गैरप्रकार; “या” कारणामुळे उमेदवारावर गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या औरंगाबाद केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. परीक्षेदरम्यान एक उमेदवार ब्लूटूथचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित उमेदवारावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीएससीने ट्विटद्वारे ही माहिती दिली.

दरम्यान, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२च्या औरंगाबाद येथील केंद्रावर परीक्षेच्यावेळी ब्लूटूथच जवळ बाळगल्याबद्दल सचिन नवनाथ बागलाने या उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एमपीएससीने ट्विटमध्ये नमूद केले आहे. एमपीएससीकडून रविवारी (दि. १५) राज्यामधील सहा केंद्रांवर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ घेण्यात आली.

स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांकडून तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार होण्याचे प्रकार अलीकडच्या काळामध्ये वारंवार निदर्शनास आले आहेत. अशा प्रकरणामध्ये एमपीएससीकडून फौजदारी कारवाईसह संबंधित उमेदवारांना प्रतिरोधितही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!