पत्नीच्या निधनानंतर दोन दिवसांत पतीचा अपघाती मृत्यू

 

नाशिकरोड (प्रतिनिधी):- नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगरच्या सिग्नलवर आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव प्रथमेश चिंधा अहिरे (वय 40, आम्रपाली नगर, कॅनलरोड, जेलरोड) असे आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे आजाराने निधन झाले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आम्रपाली नगर येथे राहणारे प्रथमेश चिंधा अहिरे हे आपल्या पॅशन प्लस (क्र. एमएच 15 सीजी 5119) या दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने जात होते.

त्यावेळी हरयाणा येथील एचआर 69 सी 6737 या क्रमांकाच्या ट्रकची धडक प्रथमेस अहिरे यांना लागली. यावेळी झालेल्या अपघातात चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. प्रथमेश यांच्या पत्नी अश्विनी यांचे दोन दिवसांपूर्वी आजाराने निधन झाले होते. तिचा फोटो तयार करण्यासाठी ते नाशिकरोड येथे आले होते. तिथून पुढील कार्यक्रम सांगण्यासाठी ते सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे जात होते. पण दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

प्रथमेश यांना तेरा आणि सात वर्षांची दोन मुले आहेत. अपघाताची माहिती समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बघून प्रथमेशचे मोठे बंधू आणि वहिनी यांनी हंबरडाच फोडला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघातामुळे नाशिक-पुणे मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती.

घटनास्थळी उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, पोलिस उपनिरीक्षक रमेश शिंदे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज पाटील, साहेबराव पवार तसेच पोलिस दाखल झाले. प्रथमेश यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली असून पुढील तपास उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!