नाशिक (प्रतिनिधी) : रिक्षा प्रवासात महिलेच्या शेजारी बसलेल्या अनोळखी महिलेने पर्समधील मंगळसूत्रासह रोकड असा 46 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
फिर्यादी मंगला विनायक भावसार (वय 58, रा. पवननगर, सिडको, नाशिक) या काल सकाळी 11 वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलपासून रिक्षामध्ये बसून घरी जात होत्या. त्यांच्या शेजारी एक अनोळखी महिला बसलेली होती. ही महिला त्रिमूर्ती चौकातील दत्तमंदिर स्टॉप येथील विशाल पेट्रोल पंपाजवळ उतरली.

त्यानंतर फिर्यादी भावसार यांनी पुढे जाऊन स्वत:जवळील पर्स बघितली असता पर्समधील 45 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व 1200 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 46 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज पर्समधून चोरी झाल्याचे लक्षात आले. ही चोरी शेजारी बसलेल्या अनोळखी महिलेनेच केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध चोरीची फिर्याद दिली आहे.