सोलापूर : जिल्ह्यातील अकलूज येथे एक आगळावेगळा विवाह सोहळा शुक्रवारी (दि. २) पार पडला. या विवाह सोहळ्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. या विवाहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. कारण एक वर आणि दोन वधू असा हा लग्नसोहळा झाला होता. उच्चशिक्षित दोन जुळ्या बहीणींनी चक्क एकाच मुलासोबत इच्छेने लग्न केले आहे. हा अनोखा विवाह सोहळा अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे संपन्न झाला. मात्र दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणे नवरदेवाला चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे. या नवरदेवाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये एनसीआर दाखल केला आहे. तर या विवाह सोहळ्याची दखल आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे.
या घटनेसंबधी चौकशीचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पाठवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

या संदर्भात ट्विट करत रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियावरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा. असा आदेश चाकणकर यांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांना दिले आहेत.
नेमके घडले काय?
मुंबईतील कांदिवली येथील पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी माळशिरस तालुक्यातील अतुल बरोबर लग्न केले आहे. दोघीही आयटी इंजिनियर असून दोघीही मुंबईतच अंधेरीमध्ये एकाच आयटी कंपनीत नोकरी करतात. दोघींना लहाणपणापासून एकमेकींची फार सवय आहे. त्या दोघी एकमेकीपासून लांब राहू शकत नसल्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणींच्या वडिलांचे निधन झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई या तीघी आजारी होत्या. अतुलने त्याच्या आजारपणात फार काळजी घेतली. त्यांनी घेतलेली काळजी आणि दाखवलेला आपलेपणा यामुळे दोघींना अतुल आवडू लागला.
त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु या दोघी कधीच वेगळ्या राहिल्या नव्हत्या त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत लग्न केले आहे. या अनोख्या विवाहाच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत.
https://twitter.com/ANI/status/1599357478038556672?s=20&t=9LYKJRHcwPek703GWKZ3tw