नाशिक (प्रतिनिधी) :- गंजमाळजवळील मास्टर मॉलला काल संध्याकाळी लागलेली भीषण आग 16 तासांनंतरही विझविण्याचे काम सुरू होते. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच बंबांच्या सहाय्याने 25 ते 30 फेर्या मारण्यात आल्या.

काल संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मास्टर मॉलला आग लागली. या आगीत मॉलमधील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. जुन्या तीन मजली इमारत असलेल्या मॉलच्या दुसर्या व तिसर्या मजल्यावर आग लागली होती. काल सुटी असल्याने मॉल बंद होते.

घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथून अग्निशमन दलाचे बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. मॉलच्या चोहोबाजूंनी दाट लोकवस्ती व झोपडपट्टीचा परिसर आहे. तसेच अरुंद गल्लीबोळांमुळे आग विझविताना अडथळे निर्माण होत होते. जवानांकडून पाण्याचा मारा करत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले; मात्र आग वरच्या मजल्यावर असल्यामुळे धुमसत होती. तासाभरात आगीने रौद्रावतार धारण केला आणि मॉलच्या पाठीमागील बाजूने भीमवाडीच्या दिशेने असलेल्या मॉलच्या भिंतीच्या जाळ्या असलेल्या छिद्रांमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला आकाशात उठत होत्या.
रात्रभर आग नियंत्रणात आलेली नव्हती. आग विझविण्यासाठी शिंगाडा तलाव येथील दोन, पंचवटी, कोणार्कनगर, सातपूर येथील प्रत्येकी एक अशा पाच बंबांच्या सहाय्याने जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर आज सकाळी नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी झालेली बघ्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी भद्रकाली पोलिसांचे पथक घटनास्थळी होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. मॉलला आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून, 16 तासांनंतरही आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत. आगीत नुकसान किती झाले हे अद्याप समजू शकले नाही.