विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांकडून मातृशक्तीचा गौरव

नागपूर : पुरुष श्रेष्ठ की महिला हा वाद आम्ही करत नाही. महिलांना घरात ठेवणे योग्य नाही. समाजात दोघांचेही काम परस्परपुरक आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी याप्रसंगी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृशक्तीचा गौरव केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संघाच्या मुख्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री संतोष यादव उपस्थित होत्या. संघाच्या विजयादशमी सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून महिलेला निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे संघाच्या दृष्टीकोनातून हा सोहळा ऐतिहासिक ठरला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचे सरसंघचालकांनी निरीक्षण केले.
नागपुरातील विजयादशमी सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कृपाल तुमाने उपस्थित होते.

जगात आपल्या देशाचे वजन वाढत आहे. अर्थव्यवस्था, क्रीडा क्षेत्रात भारत लक्षणीय कामगिरी करत असल्याचे यावेळी सरसंघचालक यांनी म्हटले आहे. समाजात मातृभाषा कमी प्रमाणात बोलली जात आहे. भाषेचे जतन करणे आवश्यक असल्याचे सरसंघचालकांनी म्हटले आहे. सरसंघचालकांनी देशाच्या लोकसंख्येवरदेखील यावेळी भाष्य केले. लोकसंख्या ही समस्या आहे, मात्र या समस्येचा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा. या लोकसंख्येचा योग्य उपयोग केल्यास देशाला फायदा होऊ शकतो, असे सरसंघचालक म्हणाले. लोकसंख्या कमी झाल्यास समाजात असमतोल निर्माण होईल, असेही भागवत यांनी म्हटले आहे.

देश संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होत आहे. कोरोनासारख्या आपत्तीकाळातून बाहेर पडून आता आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. भारताचे ऐक्य आणि प्रगती सहन न होणार्‍या शक्ती नवनिर्माणाच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा आहे. या शक्तींना उखडून टाकण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या प्रयत्नांना समाजाने साथ द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!