नाशिक (प्रतिनिधी) :- जर्मनी येथील पेडरबोर्न शहरात 15 ते 18 जुलै रोजी पार पडलेल्या मेंटल कॅलक्युलेशन वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार्या नाशिकच्या आर्यन नितीन शुक्ल याने विजेते पद पटकावले आहे, तर जपानचा ओनो टेस्तुया याने दुसरे, लेबनानच्या मुहम्मद अल मीर याने तिसरे, जपानच्या नाऊटो हिगा याने चौथे तर अमेरिकेच्या सॅम्युएल इंजेल याने पाचवे स्थान पटकावले.
15 देशातील सर्वोत्कृष्ट 40 ह्युमन कॅलक्युलेटरची ह्या स्पर्धेत निवड झाली होती. स्पर्धेतील वयस्कर स्पर्धक हा साठीच्या घरात असून 12 वर्षाच्या आर्यनने आपल्या पहिल्याच स्पर्धेत जिंकण्याचा पराक्रम केला. त्याशिवाय 5 विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केले. लेखी स्वरूपाची ही स्पर्धा असून ह्यात 10 विषयांची परीक्षा घेतली जाते आणि वेळ 7 ते 10 मिनिटांची असते.
ज्यात 10 अंकी 10 संख्यांचे बेरीज करणे ज्यात आर्यनने 7 मिनिटात 29 सेट सोडवले. तसेच 6 अंकी संख्येचे 5 अपूर्णांक पर्यंत वर्गमूळ काढणे ज्यात आर्यनने 74 संख्यांचे अचूक वर्गमूळ 10 मिनिटात काढून विक्रम केला, जो आधी 42 चा होता. तसेच जास्तीतजास्त 10 अंकी भागीले 5 अंकी संख्या सोडवणे, दोन 8 अंकी संख्याचे गुणाकार करणे, 1000 ह्या संख्येला सहा अंकी संख्येच्या वर्गमुळाने भागणे असे आणि इतर असे 10 प्रकारचे क्लिष्ट प्रश्न होते. या शिवाय स्पर्धेत सर्वांना स्वेच्छेने विश्वविक्रम करण्याची संधी देखील होती. ज्यात आर्यनने 20 अंकी संख्येला 20 संख्येने 1 मिनिट 45 सेकंदात गुणून आधीचे 3 मिनिटांचे रेकॉर्ड मोडले, तसेच 5 अंकी संख्येला 5 अंकी संख्येने कमी वेळात गुणायचे रेकॉर्ड देखील केले. 10 अंकी संख्येला 5 अंकी संख्येच्या 10 सेटला 41 सेकंदात सोडवून नवा विश्वविक्रम केला जो आधी 53 सेकंद होते .
सदरचे रेकॉर्ड भविष्यात सुधारवण्याचा आणि आणखी काही रेकॉर्ड करायचा मानस आर्यनचा आहे. एमसीडब्ल्यूसी या नावाने मेंटल कॅलक्युलेशन क्षेत्रात नावारूपास असलेली ही स्पर्धा सर्वात जास्त प्रतिष्ठित मानली जाते, मागील दोन्ही स्पर्धेत(2016,2018) जपानी खेळाडूंनी पाहिले दोन स्थान पटकावुन आपला दबदबा निर्माण केलेला होता, तर 2020 मध्ये होणारा हा चषक कोरोनामुळे 2022 मध्ये झाला. ही स्पर्धा जिंकल्याने याच वर्षी दुबई येथे होणार्या मेमोरियाड ऑलम्पिक ह्या 4 वर्षानंतर होणार्या स्पर्धेत आर्यन आता भाग घेणार आहे. कौतुकाची बाब म्हणजे आर्यन भारतीय चमू सोबत एकटाच या स्पर्धेत सहभागी झाला होता.