नाशिक (प्रतिनिधी) :- कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 3 लाख 20 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना म्हसरूळ येथील संभाजीनगरमध्ये घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रवीणकुमार मूलचंद राठोड (रा. नादब्रह्म रेसिडेन्सी, दिंडोरी रोड, संभाजीनगर, म्हसरूळ) हे दि. 3 ते 13 जूनदरम्यान कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने राठोड यांच्या राहत्या फ्लॅटच्या बेडरूमच्या दरवाजास व हॉलच्या दरवाजास असलेली कडी उघडून हॉलच्या दरवाजाच्या बाहेरून असलेल्या दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून कडी कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी बेडरूममध्ये असलेल्या कपाटाचे लॉकर तोडून त्यात असलेली 1 लाख 35 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, 60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 42 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे टोंगल, 36 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन, 15 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे वेल, 9 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, तसेच 22 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3 लाख 19 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर राठोड यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
