नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक मध्ये मराठी भवन बाबतचा प्रस्ताव लवकरच मंजूर केला जाईल अशी माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिवसेना भवनात शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना भवनात आगमन झाल्यानंतर त्यांचे संपर्क नेते भाऊ चौधरी, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरपालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, वसंत गिते, विनायक पांडे, उपनेते सुनील बागुल, मनपा गटनेते विलास शिंदे, राजेंद्र वाकसरे नगरसेवक सुनील गोडसे, देवानंद बिरारी, आदींसह अन्य नगरसेवक व पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.

पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही याचा खेद वाटत आहे. याबाबत जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. नाशिक मध्ये मराठी भाषा भवन करण्याचा प्रस्ताव हा यापूर्वी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी देईल आणि हा प्रस्ताव उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे आल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये मराठी भवन हे तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्वांनी पावले उचलण्याचा निर्णय अधिकारी वर्गासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली या बैठकीत अन्य काही निर्णय देखील घेण्यात आले आहेत.