भिवंडीत अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; चार दिवसात दुसरी घटना

भिवंडी : दोन दिवसापूर्वीच एका तीन वर्षीय अल्पवयीन चिमुरडीला मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या २६ वर्षीय नराधमाने त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यापाठोपाठ आज (दि. २५) पुन्हा अशीच धक्क्कादायक घटना भिवंडीमधील नागांव परिसरातून समोर आली असून एका तीन वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर पडीक इमारतीमध्ये अत्याचार करून हत्या करण्यात आल्याने भिवंडी शहर हादरले आहे.

याप्रकरणी अज्ञात नराधमावर शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सूरु केला आहे. दरम्यान पोलिसांनी भिवंडीमधील सर्व भाडेकरूची माहिती पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यासाठी मालकांना आवाहन केले आहे, अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील पोलीस उपायुक्त यांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरामधील नागांव परिसर खूपच दाटीवाटीच्या वस्तीमधील परिसर आहे. याच परिसरामध्ये एका चाळीत मृतक चिमुरडी आईवडिलांसह भावंडासोबत राहत होती. त्यातच मंगळवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास मृतक चिमुरडीचे आईवडील कामावर गेले होते. तर मृतक चिमुरडी भावंडांसोबत घराच्या अंगणाबाहेर खेळत असतानाच, अचानक बेपत्ता झाली. आई वडील दुपारी १ वाजल्याच्या सुमारास कामावरून घरी आले असता, मृतक चिमुरडी त्याला आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी परिसरामध्ये चौकशी करून तिचा शोध सुरू केला. परंतु, सायंकाळ होत आली तरी तिचा शोध लागत नसल्याने आईवडिलांनी शांतीनगर पोलीस स्टेशन गाठून चिमुरडी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी देखील तातडीने चिमुरडीचा शोध सुरु केला. यानंतर आज सकाळच्या सुमारास तिच्या घरापासून जवळ असलेल्या एका धोकादायक पडीक इमारतीच्या पाहिल्या मजल्यावरील एका खोलीमध्ये तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीमधील स्वर्गीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये रवाना करून अधिक उत्तरणीय तपासणीसाठी आता मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे.

दरम्यान पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात नराधमाविरोधात अपहरण, पोक्सो व अत्याचारासह हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र, लागोपाठ घडलेल्या या दोन्ही अत्याचार करून हत्येच्या घटनेमुळे भिवंडी हादरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!