जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूने पटकावले रौप्यपदक

कोलंबिया : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने आणखी एक मानाचा तुरा देशाच्या शिरपेचात रोवला आहे. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावले आहे. कोलंबियामध्ये झालेल्या स्पर्धेत मीराबाईने चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्यपदकावर नाव कोरले आहे. जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमधील मीराबाईने हे दुसरे पदक मिळवले आहे. यापूर्वी 2017 मध्ये मीराबाईने सुवर्णपदक जिंकले होते.

दरम्यान, 28 वर्षीय मीराबाई चानूने 200 किलो वजन उचलून रौप्य पदक आपल्या नावे केले आहे. तर हौ झिहुआने 198 किलो वजन उचलले. चीनच्या जियांग हुआहुआने 206 किलो वजन उचलून जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णभरारी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी स्टार भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूसाठी हे पदक मिळवणे सोपे नव्हते. मीराबाईने सुरुवातीच्या स्नॅचमध्ये 85 किलो वजन उचलले होते. दुसऱ्या प्रयत्नामध्ये तिने 87 किलो वजन उचलले. यानंतरच्या प्रयत्नात मात्र मीराबाईने 113 किलो वजन उचलून जियांग हुआहुआशी बरोबरी साधली.

मीराबाईच्या विजयानंतर तिचे प्रशिक्षक विजय शर्मा यांनी सांगितले की, या स्पर्धेसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे दडपण घेतले नव्हते. हेच वजन मीरा नेहमी सरावादरम्यान उचलते. परंतु आता आम्ही वाढलेल्या वजनाने सराव करणार आहोत. सप्टेंबर महिन्यात प्रशिक्षण सत्रादरम्यान मीराबाई चानूच्या मनगटाला दुखापत झाली होती. तिने दुखापतीसह राष्ट्रीय खेळांमध्येही भाग घेतला होता आणि इथेही ती पूर्णपणे तंदुरुस्त नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!