मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):– राज्यातील 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आज निकाल लागले. त्यामध्ये काही ठिकाणी संमिश्र निकाल लागले तर काही ठिकाणी पक्षांना निर्विवाद यश मिळाले. राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची जून महिन्यात घोषणा केली होती. त्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी प्रत्यक्षात 238 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तांदळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मच्छिंद्र गदादे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष कळसकर यांनी 10 विरुद्ध 1 अशा फरकाने विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या पॅनेलचा एकतर्फी पराभव केला. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणीकंद ग्रामपंचायतीवर भाजपच्या प्रदीप कंद यांनी 17 विरुद्ध 0 शुन्य असा एकतर्फी विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचे शिरूर विधानसभा मतदारसंघातील आमदार अशोक पवार यांच्यासाठी हा धक्का आहे.
सोलापूरमध्ये भाजपचं वर्चस्व
सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवाला आहे. तर सत्तेत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाला केवळ 1 जागावर समाधान मानावे लागले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी आपला करिष्मा कायम ठेवत 4 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात मिळवल्यात.
बीडमध्ये राष्ट्रवादीची सरशी
बीड जिल्ह्यातील एकूण 13 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी झाली. त्यात सहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, चार ठिकाणी भाजप, शिवसेना दोन तर एका ठिकाणी संमिश्र राजकीय पक्षांचा विजय झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक म्हणजे पाच ग्राम ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या.
औरंगाबादमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 12 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला 15 पैकी केवळ एका ग्रामपंचायतमध्ये यश मिळालं आहे. काँग्रेसला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. तर भाजपला एका ठिकाणी यश मिळालं. राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो आहे.
जळगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी
रावेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील 12 ग्रामपंचायतचा सर्व निकाल लागला. 10 यात ग्रामपंचायतवर काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली. काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचे वर्चस्व या ठिकाणी कायम राहिले आहे. तर भाजपाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असल्यामुळे रक्षा खडसेंना या ठिकाणी मोठा धक्का मानला जात आहे.